आंब्याची बाग
"काकू आशिष त्याच्या नावापुढे काकाचं नाव का लावत नाही ? "
"अरे तो माझा पुतण्या आहे. तो त्याच्या बाबांचे नाव लावील ना ! समजल "
काका-काकूने स्वत:च्या चार मुलांबरोबर आशिषला पण आपल्या मुलासारखे वाढवले ,इतके की दहावीपर्यंत कोणालाही कळले नाही की हा त्यांचा मुलगा नाही. काका- पुतण्याचे पण सर्वात जास्त पटत असे . पण सरळपणे सगळ कसे चालेल .
खूप हलापेष्टातून दोन्ही भावांनी दिवस काढले होते . मुंबईत कधी उपाशी तर कधी अर्ध - पोटी राहून पै पै करून पैसा जोडून गावी दोघांनी घर बांधले होते. अख्या वाडीत कोणाचे घर नव्हते तसे घर काकांनी स्वत:ची शक्कल लढवून बांधले होते.गावकऱ्यांना त्यांचा खूप हेवा वाटे. रात्रंदिवस कष्ट करून काकांनी दोन बागा विकत घेतल्या आणि आंब्याची झाडे लावली . काकांची चारही मुले शहरात शिकत होती तर तीन पुतण्या गावी संसार सांभाळून शिकत होत्या . तेही काकांनी भर घातली म्हणून . त्या सगळ्या पुतण्या मजेत,आपल्याच मस्तीत असायच्या,कारण काकांचे भाऊ सरकारी नोकरीत होते . हवे नको ते सर्व त्यांच्या मुलीना मिळत होते . तर काका इकडे काटकसरीने वागत होते . एकाच तागातील कापडाचे परकर पोलके त्यांच्या तीनही मुलीवर असत. शिवून शिवून कपडे वापरली जात. शिक्षण सुद्धा कमावा आणि शिका असेच होते . खाजगी नोकरीत पाच जणांचे शिक्षण ,कर्जाचे हप्ते फेडत होते .
आणि खरी मेख इथेच होती .कोणीतरी नतद्रष्ट हवाच असतो . विघ्नसंतोषी माणसांनी जखमेवर मीठ चोळले. . गावी कान भरले गेले . आणि त्याचे पडसाद इकडे उमटले .
आशिषच शिक्षण पूर्ण झाले . तो नोकरी करू लागला . आणि तो पूर्ण बदलला हा बदल अनपेक्षित होता . काका-काकुच्या नजरेतून हा बदल कसा निसटेल . मुलाप्रमाणेच त्यालाही त्यांनी जीव लावला होता . जे होतंय ते चुकीचे होतेय . काका-काकूने त्याच्या एका पैशालाही हात न लावण्याचे ठरवले .
चुलत्याची पोर-पोरी शिकून मोठा पगार घेतील . त्यांच्या आंब्याच्या बागा आहेत इ . अशा अनेक विचारांनी मोठा भाऊ आणि भावजयीचे मन कलुषित झाले . कोठेतरी हि प्रगती थांबली पाहिजे . जळफळाट आणि आतल्या आत होणाऱ्या वादळाने दोघा भावांमध्ये फूट पडली . भावांमधली विण तशी घट्ट होती . पण बायकोपुढे काही चालेना .
अचानक काकूवर आभाळ कोसळले काकांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला . कोणाचा जीव जाईल इतक वाईट
कोणाचेही होऊ नये . चारही मुले बिना लग्नाची,काय आणि कसं करणार होती काकू ? सगळीच कोलमडून पडली. आतल्या आत सगळीच खूप दु:खी होती . परत त्यांच्या घरातून कधीच हसण्याचा आवाज आला नाही . सर्वांच्या चेहऱ्यावरचे आनंदाचे हासू कधीच परत दिसले नाही . अनपेक्षितरीत्या आलेली हि पोकळी त्यांना सावरली जात नव्हती . आशिषने केव्हाच काढता पाय घेतला होता . पण काळाबरोबर हळू हळू बिचारी सावरली . मुला-मुलीनी एकमेकाला धीर दिला .
कोणीतरी म्हणू लागले गावाच्या नातेवाईकानी केलं हे .
काळ थांबला नाही . सगळ्यांची लग्न झाली . पण आयुष्याच्या अर्ध्यावरून सोडून गेलेल्या जोडीदाराच्या आठवणी स्वत:बरोबरच संपणार ना ! आणि मुलेही कशी विसरणार होती !
चुलत भावंडांची पण लग्न झाली सगळी मुंबईत आली . आणि चटके बसले तेव्हा कळल कि इथ तग धरून राहणेही किती कठीण आहे ते . गावचे दिवस सुखाचे होते . उगीच हेवा केला . चूक कळून काही उपयोग नव्हता.
घरातील एक व्यक्ती जाते म्हणजे एकंदरीत कुटुंब कमजोर होत . असणे आणि नसणे यातील फरक काकांच्या भावाला आणि कुटुंबाला कळेपर्यंत खूप उशीर झाला होता . आजही तेच जुने घर तसेच आहे कारण त्याला सावरणारी मजबूत व्यक्ती परत न येण्यासाठी गेली होती .काका असताना जो मान सन्मान तो आता त्यांना नाही . काका ज्या आंब्यांचा व्यापार ते थेट परदेशात करायचा अशी महत्वाकांक्षा बाळगून होते, ती बाग आज ओसाड होण्याच्या मार्गावर आहे .
काय चुकल कुठे चुकल . की अडाणीपणाने घात केला . शेवटपर्यंत कळंल नाही .